चालू बसमध्ये एका व्यक्तीचा दुसऱ्या प्रवाश्यावर कोयत्याने वार, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बारामती-इंदापूर मार्गावरील एसटी बसमध्ये काही दिवसांपूर्वी काटेवाडी येथे चालू बसमध्ये एका व्यक्तीने कोयत्याने दुसऱ्या प्रवाश्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या घटनेत एक महिला बेशुद्ध पडली होती. त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. वर्षा रामचंद्र भोसले असे महिलेचे नावं आहे. या बसमध्ये अचानक मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर (वय 21, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले होते. सगर याने अचानक कोयता काढून पवन गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर स्वतःवरही हल्ला केला. या घटनेमुळे बसमधील वर्षा रामचंद्र भोसले ही महिला प्रवासी धक्क्याने बेशुद्ध पडली. तिच्यावर बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र नंतर सदर महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या महिलेचा मृत्यू झाला.

चालत्या बसमधील कोयत्याच्या हल्ला झाला त्या धक्क्याने ही महिला बेशुद्ध पडलेली. वर्षा रामचंद्र भोसले (वय 43, रा. यादगार सिटी, बारामती) यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटना नेमकी काय घडली होती?
ही धक्कादायक घटना 31 जुलै रोजी काटेवाडी (ता. बारामती) येथे घडली. वर्षा भोसले या आपल्या माहेरी वालचंदनगर येथे जाण्यासाठी बसमध्ये प्रवास करत होत्या. त्याच बसमध्ये मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर (वय 21, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव) याने शेजारी बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने अचानक हल्ला केला.

हल्ल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी, विशेषतः महिला आणि विद्यार्थिनी घाबरून गेले. काहींनी तर थेट बसमधून उड्या मारल्या. पवन गायकवाड आणि इतर प्रवाशांबरोबरच वर्षा भोसलेही या घटनेनं मोठा धक्का बसला. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या लगेच बेशुद्ध झाल्या. प्राथमिक उपचारासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. सलग पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

वर्षा भोसले या वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रा. रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे, तर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कोयता हल्लेखोर अविनाश सगर याला तातडीने अटक केली आहे. मात्र या हिंसक हल्ल्यामुळे एका निष्पाप महिलेचा जीव गेला असल्याने, नागरिकांकडून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *