पुण्यात नऊ वर्षांच्या मुलाचा बिबट्याने घेतला बळी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पुणे (Leopard Attack in Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar News) तालुक्यातील तेळीवाडी गावात बुधवारी (25 सप्टेंबर) पहाटे एका नऊ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. ज्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला आहे. वन अधिकाऱ्यांनी (Maharashtra Forest Department) दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा त्याच्या घराजवळील शेतात नैसर्गिक विधीसाठी गेला असता, बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. जुन्नर परिक्षेत्राचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले की, मुलगा बेसावध असताना जवळच्या ऊसाच्या शेतातून बिबट्या निघाला आणि त्याने हल्ला केला. बिबट्यापुढे मुलाची ताकद कमी पडल्यनाने त्याने त्याला दाट झाडीत ओढले. जवळच असलेल्या मुलाच्या आजोबांनी ही भयानक घटना पाहिली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र तोवर सर्व संपले होते.

पीडिताचे कुंटुंबीय स्थलांतरीत विटभट्टी कामगार
सातपुते यांनी पुष्टी करताना सांगितले की, बिबट्याचा हल्ला झाल्याने मुलाच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याने मुलाचा मृतदेह शेतात दूरवर फरफटत नेला. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मुलाचे कुटंबीय हे स्थालांतरीतकामगार आहेत. ते स्थानिक विटभट्टीवर काम करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावावरुन आले आहेत. दरम्यान, वन विभागाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, बिबट्या जवळपासच्या भागात फिरत असल्याने अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यानंतर वनविभागाने तेळीवाडी व परिसरातील गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देऊन बिबट्या आजही परिसरात असल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्राण्याचा शोध घेतला जात असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिक नागरिकांनी या प्रदेशातील वाढत्या मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाबद्दल चिंता निर्माण केली आहे. विशेषत: बिबट्या अन्नाच्या शोधात त्यांच्या अधिवासातून लोकवस्तीच्या भागात जातात.

महाराष्ट्रात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष
जुन्नर तहसील हा बिबट्याच्या वारंवार दर्शनासाठी ओळखला जातो. विशेषत: ऊसाच्या शेतामुळे दडण्यास जागा निर्माण झाल्याने बिबट्यांचा वावर या ठिकाणी वाढला आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याच्या वाढत्या लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी वनविभाग आणि प्रशासन काम करत आहे.

नागरी वस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वावर ही चिंतेची बाब मानली जात आहे. दरम्यान, मानवाने जंगले नष्ट केली आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अदिवास संपुष्टात येतो आहे. परिणामी ते नागरी वस्तीत प्रवेश करत आहेत. खरे तर मानवच वन्य प्राण्यांच्या वस्तीत प्रवेशकर्ता झाला आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटना वाढल्याचे अभ्यासक सांगतात.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *