चार मुलांच्या आईने तिच्याच लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तब्बल 8 तासांनी ती महिला स्वत: पोलिस ठाण्यात गेली. तेथे तिने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. महिलेने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चकित झाले. तो दारू पिऊन तो मला आणि माझ्या मुलांना मारहाण करायचा. त्याच्या अत्याचाराला आम्ही कंटाळलो होतो. म्हणूनच त्याचा खून केल्याचे तिने कबूल केलं.
ही भयानक घटना भालसवा डेअरी परिसरातील मुकुंदपूर येथे घडली असून कबुलीनंतर पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. तिला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोहम्मद तवारक उर्फ साहिल खान असे मृताचे नाव आहे. 30 वर्षांचा साहिल हा व्यवसायाने प्लंबर होता. सात वर्षांपूर्वी त्याची या महिलेशी ओळख झाली. 2018 पासून ही महिला तिच्या पतीला सोडून साहिलसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. त्याचदरम्यान तिच्या पतीचाही मृत्यू झाला. यानंतर महिलेने तिच्या चार मुलांना सासरीच सोडले होते आणि ती मात्र तिच्या पार्टनरसोबतच रहात होती.
तर मृत साहिल खान याचंही लग्न झालं होतं. त्याला एक मूलही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. साधारण वर्षभरापूर्वी ति महिला तिच्या मुलांना दिल्लीत घेऊन आली आणि तिची मुलही त्यांच्यासोबत राहू लागली. महिनाभरापूर्वी ती बिहारमधील खगरिया या तिच्या गावी गेली होती. ती रविवारी परत आली आणि तिने साहिलला घर सोडण्यास सांगितलं, मात्र साहिलने त्यासाठी थेट नकार दिला. त्यानंतर मंगळवारी दुपारी साहील दारूच्या नशेतच घरी आला आणि त्याने त्या महिलेचा छळ सुरू केला.
स्क्रू ड्रायव्हरने भोसकलं
त्यावेळी चारही मुलं घरीच होती. तेव्हा पुन्हा एकदा त्या महिलेने साहिलला घर सोडण्यास सांगितले. यावेळी त्याचा वाद झाला आणि बघता बघता भांडण वाढलं. रागाच्या भरात आरोपी महिलेने साहिल खानच्या डोक्यावर दगड आणि हातोड्याने जोरदार वार केले. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला. तो बेशुद्ध झाल्यावर तिने त्याच्या संपूर्ण शरीरावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. साहिलची हत्या केल्यानंतर ती महिला जवळपास आठ तास मृतदेहासोबत घरातच बसली होती .
पोलिसांत केलं आत्मसमर्पण
अखेर रात्री 10 च्या सुमारास तिने स्वत: पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली, ते ऐकून पोलीसही हादरले. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तळमजल्यावर साहिलचा रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात मुलांचीही साक्ष घेण्यात येणार आहे. या घटनेची माहिती मुलांच्या आजी-आजोबांना देण्यात आली असून त्यांच्यांकडे मुलांचा ताबा सोपवला जाईल.