पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना वाचवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होता. 19 मे रोजी घडलेल्या या अपघातात अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत अभियंता तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा अल्पवयीन मुलाने स्कॉर्पियो कारने तीन वाहनांना धडक दिली. त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहे. अल्पवयीन मुलगा लष्करातील सैनिकाचा आहे.
मित्राची गाडी घेऊन भरधाव
पुणे नाशिक महामार्गावर अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धकड दिली. त्यात रिक्षा चालक अमोद कांबळे (वय 27) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक 17 वर्ष 10 महिन्यांचा आहे. तो पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील भारतील लष्करात सैनिक आहे. त्या मुलाने मद्यपान केल्यानंतर मित्राची एसयुव्ही कार भोसरीवरुन नाशिका फाटापर्यंत वेगाने नेली. त्यानंतर त्या गाडीवरील त्याचे नियंत्रण गेले. त्याने तीन वाहनांना धडक दिली आणि एक डिव्हाडरला ठोकली.
एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
भरधाव असणाऱ्या एसयूव्ही कारच्या धडकेमुळे ऑटोरिक्षा, एक स्कूटर आणि एक मोटारसायकल यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षा चालक कांबळेचा मृत्यू झाला तर स्कूटर आणि मोटार सायकलवर असणाऱ्या दोघे गंभीर जखमी झाले.