एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण शीळ रोड टाटा पॉवर जवळ घडली आहे. रस्त्याने चालत असताना एका इसमाचा पाय घसरला आणि हा इसम थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. बाबू धर्मा चव्हाण असे या मयत इसमाचे नाव आहे.

पाय घसरून चेंबर मध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी या इसमाला उपचारासाठी डोंबिवली मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कल्याण शीळ रोडवर या भागात अनेकदा उघड्या चेंबर्स बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र एमआयडीसीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये एमआयडीसीचे उघडे चेंबर होते. रविवारी या ठिकाणाहून बाबू धर्मा चव्हाण हे चालत होते. यावेळी चव्हाण यांचा पाय घसरला आणि ते थेट बाजूलाच असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. एक इसम चेंबर मध्ये पडलाय हे आजूबाजूच्या नागरिकांनी पाहिलं. चव्हाण यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

बाबू चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती. संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे चव्हाण यांचा बळी गेला.

आज आमचे वडील गेले, उद्या कोणाच्या बाबतीत अशी घटना घडू नये. आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी धर्मा चव्हाण यांच्या दोन्ही मुलांनी केली. हे चेंबर कायमच उघडं असतं असा आरोप काशिनाथ चव्हाण आणि प्रवीण चव्हाण या त्यांच्या दोन्ही मुलांनी केला. या ठिकाणाहून अनेक गाड्या सुद्धा जात असतात. उद्या कोणताही अनुचित प्रकार दुसऱ्याच्या घरी घडू नये अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली.

दुसरीकडे संताप्त नागरिकांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मांडली. तर याबाबत मोरेश्वर भोईर यांनी एमआयडीसी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. एमआयडीसी 27 गावांच्या नागरिकांच्या जीवावर उठली आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेस एमआयडीसी प्रशासन जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *