अकोल्यात एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिलानंद तेलगोटे हे अकोला (Akola Suicide) जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर एक स्टेटस ठेवले होते. त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यूपूर्वीच्या या स्टेटसमध्ये पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही तेलगोटे यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी शिलानंद तेलगोटे (Shilanand Telgote) यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल. दरम्यान, शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉटसॲप स्टेटसमध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.
शिलानंद तेलगोटे यांचं मृत्यूपूर्वीचं व्हॉट्सअप’वर स्टेटस नेमकं काय ?
मी श्री. शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टेम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल…