मुंबईत एका ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला येथे घडली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती शांतपणे हाताळल्यामुळे नेटकऱ्यांनी पोलिस हवालदाराचे कौतुक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी एका कारने मोटरसायकलला धडक दिली. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कार चालकाने घटनास्थळी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. मात्र, शांतता राखून पोलिसांनी परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पोलिसाचे कौतुक केले आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. कार चालकावर गुन्हा दाखल करा अशी नेटकऱ्यांनी केली आहे. हा व्हिडिओ साहिल जाखर नावाच्या एक्स युजरने पोस्ट केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने पोलिसावर आवाज चढवला. त्यांना शिवीगाळ करत धक्काबुकी केली. जर कारवाई केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागणार अशी धमकी देत असल्याचे व्हिडिओत ऐकू येत आहे.