अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवाशी होते. अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. तर दुसरीकडे एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत असलेल्या एका तरुणाचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
अहमदाबादमध्ये आज झालेल्या भीषण विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद गावाचे मूळ रहिवासी असलेले महादेव तुकाराम पवार (६७) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (५५) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनला मुलाला भेटण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पवार कुटुंब हे सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. कारण त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये राहतो. तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करतो.
त्यांच्या लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघेजण जात होते. हे दोघे पती-पत्नी अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या अपघाताच्या अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच महादेव आणि आशा पवार हे दोघे त्यांच्या मूळ गावी हातीद येथे भावांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर काही दिवसांतच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने हातीद गावावर शोककळा पसरली आहे.
बदलापूरच्या तरूणाचा संपर्कच नाही
तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक पाठक हे गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत होते. दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
दीपक पाठक यांचं कुटुंब बदलापूरच्या कात्रप भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे. दीपक यांनी आज सकाळीच लंडनला निघण्यापूर्वी आईला फोन केला होता. दीपक यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह त्यांच्या घराकडे धाव घेतली. दरम्यान आपला देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत, जोवर त्यांच्याबाबतीत अधिकृत माहिती मिळत नाही. तोवर आम्ही आशावादी राहणार आहे, असे दीपक पाठकच्या बहिणीने म्हटले आहे.