श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या एका कावड यात्रेला गालबोट लागले आहे. या कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया फॉरेस्ट परिसरात हा अपघात झाला. ही बस गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर धडकल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण देवघर परिसरात शोककळा पसरली आहे.
“माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर येथे श्रावण महिन्यात कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला. बाबा बैद्यनाथ त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.