भारत आणि बांगलादेश (IND vs BAN 1st Test) यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandra Ashwin) विश्वविक्रम केला आहे. त्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याने खरंतर फलंदाजीत नाही तर अष्टपैलू म्हणून विश्वविक्रम केला आहे. अश्विनने आपल्या कारकिर्दीत 6 शतकांव्यतिरिक्त 16 अर्धशतकेही झळकावली आहेत. रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून 20 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा आणि गोलंदाजीत 30 पेक्षा जास्त 5 बळी घेणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असे यापूर्वी कधीही घडले नव्हते, त्यामुळे एकाच वेळी अशी कामगिरी करणारा अश्विन जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धचा सामना हा अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील 101 वा सामना आहे. त्याने फलंदाजीत 3,400 हून अधिक धावा केल्या आहेत आणि या कालावधीत, 6 शतकांसह, त्याने 14 अर्धशतके देखील केली आहेत. गोलंदाजीत, त्याने कसोटी सामन्यांमध्ये 36 पेक्षा जास्त वेळा एकाच डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
अश्विनची आकडेवारी देखील मनोरंजक बनते कारण त्याने आठव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना 4 शतके झळकावली आहेत. आतापर्यंत आठ किंवा खालच्या क्रमाने सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीच्या नावावर आहे. या क्रमवारीत फलंदाजी करताना त्याने 5 शतके झळकावली.
रविचंद्रन अश्विन तामिळनाडूतून आला असून त्याच्या घरच्या मैदानावरील फलंदाजीचा विक्रमही अतिशय उत्कृष्ट आहे. आतापर्यंत, त्याने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 5 कसोटी सामन्यांच्या 7 डावात 331 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 55 पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, बॉलिंगवर नजर टाकली तर ‘प्रोफेसर’ अश्विनने चेन्नईच्या स्टेडियममध्ये आतापर्यंत 30 हून अधिक विकेट घेतल्या आहेत.