क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने ग्राउंडवरच मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अलीकडच्या काळात तरुणांना हर्ट अटॅक येण्याचे प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही अनेकदा क्रिकेट (Cricket) खेळताना किंवा बसल्या जागेवर तरुणांना ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने प्राण गमवावे लागल्याचं आपण पाहिलं आहे. आता, पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेदरम्यान 32 वर्षीय युवकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. विशेष म्हणजे आपल्या सहकारी फलंजासोबत बोलल्यानंतर काही क्षणांतच हा युवक खाली कोसळल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने ग्राउंडवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय पटेल असं मयत तरुणाचे नाव असून, आज सकाळी शहरातील ‘फ्रेजर बॉईज’ या मैदानावर ख्रिसमस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरू होते. या सामन्यांदरम्यान बॅटिंग करताना तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जागेवरच कोसळला. त्यानंतर, मैदानावरील सहकारी मित्रांनी व खेळाडूंनी धावाधाव केली. तर, आयोजकांनी या तरुणाला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यामुळे, अचानक झालेल्या या दुर्घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मैदानावर सिक्सर मारल्यानंतर सहकारी मित्रासोबत तो चर्चा करत होता. मात्र, चर्चेनंतर तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अचानक खेळता खेळता विजय खाली पडल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, पण ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची रुग्णालयात सांगण्यात आल्याची माहिती त्याच्या मैदानावरील सहकारी मित्राने दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *