मध्य प्रदेशातील छतरपूर एका ७० वर्षीय वृद्धाला स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. मात्र जिल्हा रुग्णालयात वेळेवर तपासणी झाल्याने कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी हा रुग्ण पूर्णपणे बरा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. यानिमित्ताने पुरुषांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं कारणं काय? तो दुर्मिळ का असतो, याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.
नेमकं काय घडलं?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून या वृद्धाला त्यांच्या डाव्या स्तनाजवळ आणि आसपासच्या भागांत सूज आली होती. सुरुवातीला त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेतले. पण तरीही सूज कमी झाली नाही. यानंतर डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉ. श्वेता गर्ग यांनी या वृद्धाची तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याचे उघड झाले.
सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. डॉ. गर्ग यांच्या मते, रुग्णाच्या स्तनाला सूज आली होती. त्यानंतर एफएनएसी (Fine Needle Aspiration Cytology) ही तपासणी करण्यात आली. या अहवालात त्या रुग्णाला कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले.
पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग दुर्मिळ
पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग दुर्मिळ असला तरी तो गंभीर आहे. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने महिलांमध्ये आढळतो, परंतु पुरुषांनाही तो होऊ शकतो. दरवर्षी सुमारे १.७८ लाख स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणे समोर येतात. त्यापैकी १-२ प्रकरणे पुरुषांशी संबंधित असतात. पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग कमी प्रमाणात आढळत असल्याने, अनेकदा पुरुष लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे उपचारास विलंब होतो.
पुरुषांमध्ये स्तनांच्या कर्करोगाची कारणे
वाढते वय
कुपोषण
लठ्ठपणा
अनुवंशिकता
हार्मोनल असंतुलन
रेडिएशनचा संपर्क
यकृताचे आजार
फॅमिली हिस्ट्री
तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या
जर स्तनामध्ये कोणतीही सूज किंवा बदल जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण वेळेवर निदान झाल्यास कर्करोगावर प्रभावी उपचार शक्य आहेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.