मोठी बातमी! ‘या’ माजी नगराध्यक्षाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. महाडमधील चांदे मैदानावर पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्नेहल जगताप या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या होत्या, स्नेहल जगताप यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या त्या प्रमुख राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जातात. सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे, इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांकडूनही रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीमध्ये आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीने स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे, त्यामुळे येथील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. या प्रवेश सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 232 जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जगांवरच समाधान मानावं लागंत. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे, महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाला लागलेली गळती ही शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरली आहे.

शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे, स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *