पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आता मोठी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ज्या व्यक्तीने रसद पुरवली, त्याने नदीत उडी मारून स्वत:ला संपवलं आहे.

नदीत उडी मारतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद
दहशतवाद्यांना रसद आणि अन्न दिल्याची कबुली या आरोपीने दिली होती. दहशतवाद्यांच्या स्थळावर घेऊन जाताना आरोपी पळाला. पळ काढून त्याने विश्वा नदीत उडी मारली, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या आरोपीने नदीत उडी मारतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इम्तियाज अहमद मगरे असं या आरोपीचं नाव आहे.

3 मे रोजी पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात
इम्तियाज मगरे याला पोलिसांनी 3 मे रोजी ताब्यात घेतलं होतं. पहलगामच्या दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पोलीस त्याला ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणाहून त्याला दहशतवाद्यांच्या तळावर नेले जात होते. मात्र पोलिसांच्या हातातून सुटून त्याने विश्वा नदीत उडी घेतली आहे. त्याचा यात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला हा आरोप 23 वर्षांचा होता.

नेमका कसा पळाला?
मिळालेल्या माहितीनुसार इम्तियाज याने दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याचं कबुल केलं होतं. दहशतवादी ज्या ठिकाणी लपलेले आहेत, ते ठिकाण मी तुम्हाला दाखवतो, असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले होते. मात्र मध्येच त्याने विश्वा नदीत उडी घेतली.

अनेक प्रश्न उपस्थित
या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी मृत आरोपी हा महत्त्वाचा दुवा होता. मात्र त्याने नदीत उडी घेत स्वत:ला संपवलं. त्यामुळेच आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मेहबुबा मुफ्ती यांचे गंभीर आरोप
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. “पहलगामच्या हल्ल्यातून जम्मू-काश्मीरचे पर्यटन कमी करण्याचा, सांप्रदायिक सद्भावनेवर घाला घालण्याचा, काश्मीरमधील शांती भंग करण्याचा एक नियोजित कट असल्याचे वाटत आहे. हिंसेची एखादी घटना संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करू शकते. मनमानी पद्धतीने लोकांना अटक केलं जातंय, घरांना नेस्तनाबूत करून टाकलं जातंय, निर्दोष नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. पहलगाच्या रुपात गुन्हेगारांनी त्यांचा हेतू साध्य करून घेतला आहे. कुलगाममधील हे प्रकरण फारच गंभीर आहे,” अशी प्रतिक्रिया मुफ्ती यांनी दिलीय. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे असल्याचीही मागणी त्यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *