लेखणी बुलंद टीम:
76 वर्षीय पत्नीच्या ब्रेन ट्युमरसह आजारापणाला कंटाळून 78 वर्षीय निवृत्त मुख्याध्यापक पतीने तिचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जेलरोड (jailroad) परिसरातील सावरकरनगरात बुधवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणात उपनगर पोलिसांनी मृत पतीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा नोंदवून स्वतः आत्महत्या केल्याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गुरुवारी दुपारी या पती-पत्नीवर त्यांची मुले व कुटुंबाच्या हजेरीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, निवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी आता समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावरकरनगरातील एकदंत अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (78) हे निवृत्त शिक्षिका असलेली पत्नी लता यांच्यासह राहत होते. त्यांना दोन मुले असून एक प्राचार्य तर दुसरा लघुउद्योजक आहे. दरम्यान, लता यांना 2017 पासून मेंदूविकाराचा त्रास उद्भवला होता. उपचार सुरू असतानाच अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. त्यातून त्या सावरल्यानंतर दोघे पती-पत्नी एकमेकांना सावरत होते. पण वृद्धापकाळ व त्यातील आजारपणास दोघेही कंटाळले होते.
आमच्या मरणास कुणालाही कारणीभूत ठरवू नये
रोजचे दिवस कंठत असतानाच बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोशी यांनी लताचा गळा आवळून खून केला तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हे सर्व कृत्य करण्यापूर्वी जोशी यांनी सुसाईड नोट लिहून ‘पत्नीला स्वर्गलोकी पाठवले आहे, मी तिच्यासोबत जात आहे, आमच्या मरणास कुणालाही कारणीभूत ठरवू नये’, असे लिहून गळफास घेतला. तर घरकाम करणाऱ्या महिलेस 50 हजार रुपये द्यावेत, असे देखील त्यांनी लिहिले आहे.
चिठ्ठीत नेमकं काय म्हटलंय?
मी मुरलीधर रामा जोशी. पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी मला माफ करावे. सीमाने (गृहसेविका) खूप सेवा केली. तिला माझ्याकडून 50 हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी पैशांचा उपयोग होईल. लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले पाच हजार अंत्यविधीसाठीचे पैसे आहेत. मंगळसूत्र, जोडवी आहेत. ते लताला घालावेत. नंतर सीमा राठोड हिला द्यावेत. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही, असे त्यांनी आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.