दोन आठवडे तेल खाल्लच नाही तर काय होईल? काय म्हणतात तज्ञ?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये तेलाचा वापर सर्वाधिक केला जातो. स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्यतेल (Food Oil) जेवणाची चव वाढवणारे हे तेल पदार्थ शिजविण्यासाठी वापरले जाते. आपल्या स्वयंपाकघरात सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सर्वच पदार्थ तेलाच्या मदतीने तयार केले जातात. पण जर तुम्ही दोन आठवडे तुमच्या आहारात तेलाचा समावेश केला नाही, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, तुम्हाला माहीत आहे का, याच विषयावर आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा सांगतात, “दोन आठवड्यांसाठी तेलाचा वापर पूर्णपणे बंद केला तर पचन आणि चयापचयावर अनेक अल्पकालीन परिणाम होऊ शकतात. तेलामध्ये फॅटी अॅसिड असते, जे चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वे (ए, डी, ई, के) शोषून घेतात. ते न मिळाल्याने पोषक घटकांचे शोषण बिघडू शकते, ज्यामुळे पोटाच्या हालचालींत बदल होऊन पोटफुगी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या कमतरता आणि पचनातील अस्वस्थता उद्भवू शकते.”

चयापचयातील बदलांच्या बाबतीत, त्या नमूद करतात की, आहारातील चरबी कमी केल्याने सुरुवातीला उष्मांक कमी होऊ शकतात, ज्यामुळे वजन कमी होण्याची शक्यता असते. तथापि, यामुळे चयापचय प्रक्रियांमध्येही व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे भूक वाढू शकते. आहारातून पूर्ण तेल काढून टाकल्याने शरीराची चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वे शोषण्याची क्षमता लक्षणीयरीत्या बिघडू शकते. तेलाचा वापर पूर्णपणे बंद केला, तर आवश्यक पोषक घटकांची जैवउपलब्धता कमी होते. दृष्टी, रोगप्रतिकार शक्ती आणि हाडांच्या आरोग्यासारख्या विविध शारीरिक कार्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त भाज्यांमधून कॅरोटीनॉइड्ससारख्या इतर पोषक घटकांचे शोषणदेखील चरबीशिवाय कमी होऊ शकते.

खाद्यतेलाचे सेवन वर्ज्य केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम
त्वचेच्या आरोग्यात बिघाड: तेल आपल्या शरीराला आवश्यक फॅटी अॅसिड प्रदान करते, परंतु, तेलाचा वापर न केल्याने कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.

पुरेशा ऊर्जेअभावी थकव्यासह सहनशक्तीत घट: शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यास व्यक्तींना थकवा जाणवेल आणि सहनशक्ती कमी झाल्याचा अनुभव येऊ शकतो. कारण- चरबी हा घटक तृप्तीचा अनुभव देतो आणि शरीरात सातत्याने ऊर्जा कायम ठेवण्यास हातभार लावतो.

चिडचिडेपणाचा अनुभव: पोषक घटकांचे अपुरे शोषण झाल्यामुळे चिडचिडेपणाचा अनुभव येऊ शकतो.

तेलांमधून मिळणाऱ्या आवश्यक फॅटी अ‍ॅसिडच्या भरपाईसाठी आहारात समावेश करावयाचे पदार्थ खालीलप्रमाणे
फॅटी फिश: सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन व हेरिंग हे मासे ओमेगा-३ या फॅटी अ‍ॅसिड (EPA आणि DHA) ने समृद्ध असतात. हे ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

बिया : अळशीचे बियाणे आणि चिया बियाणे हे वनस्पती-आधारित ओमेगा-३, अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड (ALA)चे उत्कृष्ट स्रोत आहेत.

फोर्टिफाइड फूड्स: फोर्टिफाइड फूड्सचा वापर सामान्यतः आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी केला जातो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *