मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना मंजूर करण्यात आली आहे. घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठी घोषणा केली आहे. शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड आता विनामूल्य मिळणार आहे. यामुळे आता शेतापर्यंत कृषी यंत्रसामग्री वाहतूक सहज शक्य होणार असून याबाबत महसूल विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
गावागावात पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची अवस्था खराब असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर सरकारने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य!
याशिवाय राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दिनापासून ‘एक राज्य एक नोंदणी’
दरम्यान, महाराष्ट्रात येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मेपासून ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबवण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या उपक्रमामुळे पुण्यात बसून नागपुरातील घराची किंवा मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी नोंदणी करता येईल. ही सर्व प्रक्रिया फेसलेस असेल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किवा तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. अनेकदा या प्रकरणी नागरिकांचा मोठा वेळ व पैसे वाया जातात. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 मेपासून राज्यात एक राज्य एक नोंदणी धोरण राबवण्याची घोषणा केली आहे.