ओैषध प्रशासन विभागाकडून १४०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

शहरात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) आणि पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या पथकाने मांजरीतील एका भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या उत्पादकाच्या कारखान्यात कारवाई केली. या कारवाईत १४०० किलो पनीर, भेसळ करण्यासाटी वापरली जाणारी १८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा ११ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मांजरी भागातील एका शेतातील गोदामात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीरचा साठा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस कर्मचारी सचिन पवार, रमेश मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एफडीएच्या पथकाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर एफडीए आणि पोलिसांच्या पथकाने मांजरीतील माणिकनगर परिसरात असलेल्या गोदामावर छापा टाकला. गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले. पंचासमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगाळेत पाठविण्यात आले. भेसळयुक्त पनीरचा साठा पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.

एफडीएचे सहआयुक्त डॉ. राहुल खाडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, एफडीएतील अधिकारी नारायण सरकटे, बालाजी शिंदे, अस्मिता गायकवाड, सुप्रिया जगताप, एल. डब्ल्यू. साळवे, तसेच पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

भेसळयुक्त खाद्यपदार्थ निर्मिती, तसेच विक्रीचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहआयुक्त डाॅ. राहुल खाडे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *