लेखणी बुलंद टीम:
मेष : व्यवहाराची घडी बसेल
दिनांक १५, १६ हा दोन दिवसांचा कालावधी अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही. कारण या दिवसांत ज्या घडामोडी होतील त्या आपल्या मनासारख्या होतील असे नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडू शकतात, त्यामुळे तुमचे मन नाराज होऊ शकते. अशा वेळी या दिवसांत महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे नाही; जेव्हा चांगले दिवस असतील अशा वेळीच महत्त्वाच्या कामांचा विचार करायचा. म्हणजे त्रास होत नाही. बाकी दिवस चांगले असतील.
व्यवसायात विस्कळीत झालेली व्यवहाराची घडी व्यवस्थित बसेल.
नोकरदार वर्गाचा कामातील उत्साह वाढेल. आर्थिकदृष्ट्या उधार-उसनवारी करू नका. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. मुलांसोबत करमणूक होईल. घरगुती वातावरण ठीक राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.
वृषभ : व्यवस्थापन उत्तम जमेल
सध्या सप्ताहात सर्वच दृष्टिकोनातून ग्रहमान उत्तम आहे, त्यामुळे कोणताही संघर्ष करावा लागणार नाही. ठरवून ठेवल्याप्रमाणे कामे होत राहतील. परिणामी तुमचा कामातील उत्साह वाढेल. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. स्वत:चे काम स्वत: कराल. व्यवस्थापन उत्तम जमेल.
व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाला शासकीय कामात यश मिळेल.
आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी मिळेल. स्वार्थापोटी स्तुती करणाऱ्या मैत्रीपासून लांब राहा. कुटुंबात असलेले गैरसमज वेळीच दूर करा, म्हणजे वाद होणार नाहीत. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
मिथुन : आघाडी मिळवाल
मागील काही सप्ताहांत प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. काही दिवस चांगले तर काही दिवस खूपच त्रासदायक अशी परिस्थिती होती. हा आठवडा चांगला असेल. ज्या वेळी दिवस चांगले असतात त्या वेळी गप्प बसायचे नाही हे लक्षात ठेवा. आपली जी कामे बाकी आहेत त्या कामांसाठी प्रयत्न वाढवायचा म्हणजे या चांगल्या दिवसांत प्रयत्नांना यश मिळते हे लक्षात ठेवा. इतरांवर अवलंबून राहायचे नाही. आपले काम आपणच करायचे. व्यवसायात मोठ्या उत्पन्नाची हमी मिळेल. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आर्थिक बाबतीत आघाडीवर असाल. राजकीय क्षेत्रातील पारडे जड होईल. नातेवाईकांच्या समस्या सोडवण्यात यश मिळेल. भावंडांशी संवाद साधाल. प्रकृती उत्तम राहील.
कर्क : कौशल्याला वाव मिळेल
दिनांक ९ रोजी संपूर्ण दिवस व १० तारखेला दुपारपर्यंत असा हा दीड दिवसाचा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत कोणतेही काम करताना दूरदृष्टी ठेवा. जबाबदारीचे काम या दिवसांत दुसऱ्याकडे सोपवू नका. व्यवहार करताना जपून. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. व्यवसायात नवीन कलाकौशल्याला वाव मिळेल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी दूर होतील. कामाचे कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. समाजसेवेची आवड निर्माण होणार नाही. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळे बोलल्याने हलके वाटेल.
नातेवाईकांशी संवाद साधताना जेवढ्यास तेवढा असाचा राहू द्या. शेजाऱ्यांपासून अलिप्त राहा. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : वेळेचे भान ठेवा
दिनांक १०, ११, १२ असे तीन दिवस चढउताराचे असतील. असे दिवस असले की लक्षात ठेवा, समोरून येणारा प्रस्ताव चांगला नसतोच आणि नेमका याच दिवसांत प्रस्ताव येतो नि आपण अशा प्रस्तावाला बळी पडतो, फसवणूक होते. मग ती फसवणूक नुकसानीची ठरते. अशा वेळी सावधपणे पाऊल उचलणे गरजेचे राहील. जितकी गरज आहे तितक्याच गोष्टींचा विचार करा. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या. घाईगडबड करू नका. कोणतेही काम करताना वेळेचे भान ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे. आर्थिक व्यवहार करताना जपून करा. समाजमाध्यमांचा वापर गरजेपुरता करा. मित्र-मैत्रिणींची मदत घ्या, पण व्यवहार चोख ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : हजरजबाबीपणा राहील
दिनांक १३, १४ हे दोन दिवस कसरतीचे असतील. तुम्हाला असे वाटेल, माझ्याच वाट्याला ही कसरत का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा,असे दिवस आपली परीक्षा पाहते. या दिवसांत काटेकोरपणे नियमांचे पालन करा. काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांसाठी वेळ न देता स्वत:च्या कामासाठी वेळ द्या, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. तुमच्याकडे एक प्रकारचा हजरजबाबीपणा असेल. संघर्षदायक गोष्टींचा कालावधी नष्ट होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. शुभ संकेत मिळतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. आर्थिक बचत करा. मित्रपरिवाराची मदत मिळेल. संततिसौख्य लाभेल.
प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : उद्दिष्ट गाठाल
१५ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. बाकी दिवसांमध्ये चंद्राचे भ्रमण अतिशय शुभदायक असेल. या कालावधीत आपण म्हणाल ती पूर्व दिशा असेल. म्हणजे गोष्टी चांगल्याच घडतात. त्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. मात्र पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ त्वरित मिळत असते. चढउतारांचा सामना दरवेळी करावाच लागतो. सध्या मात्र हा करावा लागणार नाही, यालाच उत्तम कालावधी म्हणतात. व्यवसायात तुम्ही जे उद्दिष्ट ठरवलेले आहे त्या उद्दिष्टांपर्यंत नक्कीच पोहोचाल. नोकरदार वर्गाला नवीन कामासंदर्भात चांगले प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव स्वीकारा. आर्थिक प्रश्न सुटेल. राजकीय क्षेत्रात थांबलेल्या कामाला गती येईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. धार्मिक कार्याची आवड राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : फलप्राप्ती होईल
दिनांक ९ व १० तारखेला दुपारपर्यंत असा दीड दिवसाचा कालावधी अनुकूल नाही. बाकी दिवसांत चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे; तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. आपले मत इतरांना पटणारे असेल. अशा वेळी तुम्ही संधी गमावत नाही. आपले काम पूर्ण करून घेण्याची तुमच्याकडे एक प्रकारची हुशारी असते. आपल्या मर्जीप्रमाणे इतरांना वागण्यासाठी भाग पाडता आणि आपले काम पूर्ण करून घेता. व्यवसायात अपेक्षित फलप्राप्ती होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात चिकाटीने काम कराल. संकल्पना मार्गी लागतील. ज्ञानकौशल्य वाढेल. उपासनेत मन रमेल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. धर्मकार्य पार पाडाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्य चांगले राहील.
धनू : अनुभव विसरू नका
१० तारखेला दुपारनंतर, दिनांक ११, १२ हे संपूर्ण दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी तसा अडचणीचाच आहे. अशा वेळी धीर न सोडता मार्ग काढणे हा पर्याय असेल. ज्या ठिकाणी आपल्याला निर्णय घेणे जमत नाही अशा ठिकाणी मोठ्यांचा सल्ला घ्या. मागील अनुभव विसरू नका. पुन्हा त्याच त्याच गोष्टी करण्यात अर्थ नाही हे लक्षात ठेवा. शांतपणाने प्रत्येक गोष्टीवर मार्ग मिळतो. विचार करून निर्णय घ्यायला शिका, म्हणजे त्रास होणार नाही. पौर्णिमा कालावधीत सहनशीलता वाढवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात फार मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवू नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा सल्ला फायद्याचा ठरेल. आर्थिक उधारीचे व्यवहार टाळा. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. मानसिक स्वास्थ्य जपा.आरोग्याची काळजी घ्या.
मकर : वादविवाद टाळा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्या वेळी असे भ्रमण असते त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, सध्या आपली डाळ शिजणार नाही. कारण नसताना गोष्टी अंगलट येऊ शकतात. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घ्या. आपल्या मर्जीने समोरच्याने वागावे ही भावना सध्या तरी मनात ठेवू नका. तुमच्या काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, त्यामुळे तुमची चिडचिड होईल आणि हा राग तुम्ही जो समोर दिसेल त्याच्यावर काढाल. वादविवाद टाळा. पौर्णिमा कालावधी ठीक राहील. व्यवसायातील भागीदारीत यश मिळेल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत जाणून घेतल्यानंतर निर्णय घेणे योग्य राहील. आर्थिक बचत करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील ते पाहा. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : सकारात्मक विचार करा
दिनांक १०, ११, १२ व १५ असा हा चार दिवसांचा कालावधी अनुकूल नाही. म्हणजे या चार दिवसांत जे काही करायला जाल ते पूर्ण होईलच असे नाही. तेव्हा या कालावधीत कोणतेही काम करताना भान ठेवा. उशीर होणार आहे हे गृहीत धरून चला, म्हणजे त्रास होणार नाही. मग या दिवसांत प्रयत्न करायचे नाही का? तर तसे नाही. प्रयत्न तर करायचेच, फक्त काम लवकर पूर्ण होईल ही अपेक्षा या दिवसांत ठेवू नका. इतरांनी आपले काम करावे ही अपेक्षा सोडून द्या. सकारात्मक विचार करा. पौर्णिमा कालावधीत शांतता पाळा. व्यवसायात जे चालले आहे ते चांगले समजा आणि पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्या. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. कुटुंबाची काळजी घ्या. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जपा.
मीन : योग्य मुद्दे मांडा
दिनांक १३, १४ या दोन दिवसांत येणारे प्रस्ताव चांगलेच असतील असे नाही; तेव्हा घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. बोलताना दोन शब्द कमी बोला. योग्य मुद्दे मांडा. म्हणजे समोरच्याचा गैरसमज होणार नाही. आपले मत इतरांना पटेल असे नाही, पण समजून सांगण्याचा प्रयत्न करा. समोरच्याला नाही पटले तर तो विषय तिथेच सोडून द्या. त्यावर फारसा विचार करत बसू नका. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न बरे असेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करताना सतर्कता बाळगावी लागेल. आर्थिक उधारीचे व्यवहार टाळा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. संततिसौख्य लाभेल. जोडीदाराची मदत मिळेल. प्रकृती ठीक राहील.