मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा बंड पुकारणार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मराठा आरक्षणावरून आता मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुन्हा एल्गार पुकारणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी महायुती सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले. त्यांनी दीड वर्षाचा लेखाजोखा मांडत संताप व्यक्त केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. उद्यापासून 25 जानेवारीपासून ते पुन्हा आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले. त्यांनी दीड वर्षाचा लेखाजोखा मांडत संताप व्यक्त केला. त्यांनी या आंदोलनाची दिशा अजून समोर आणलेली नाही. उद्या कदाचित याविषयीची माहिती समोर येणार आहे.

माझ्या समाजाचा छळ का?

दीड वर्ष झालं आंदोलन सुरू आहे, इतके दिवस झालं माझ्या गोर गरीब समाजाचा का छळ करताय, असा रोकडा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मूळ मागणीसह इतर मुख्य मागण्यासाठी मी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी सर्टिफिकेट देणे, नोंदी शोधणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सगे सोयरे जीआरची अंमलबजावणी करणे, EWS आरक्षण पुन्हा लागू करणे या मागण्या आहेत. मराठा समाजाची मन जिंकून घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही संधी आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होणार आहे. मराठ्यांशी गद्दारी आणि बेईमानी करू नका हे फडणवीस यांना माझं सांगणे आहे.मराठ्यांशी गद्दारी बेईमानी केली तर मग मात्र सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमच्या मुलावर विनाकारण गुन्हे दाखल केलेत, नुसती कमेंट केली म्हणून 9 महिने जेल मध्ये ठेवलं, महिला तडीपार केल्या, आमच्या महिलांचे डोके फोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मराठ्यांबद्दल यांच्या मनात द्वेष असल्याचा आरोप त्यांनी केला.

महायुतीतील मराठ्यांना लक्ष्य

आपल्या लेकरांसाठी हे सरकार काय करणार आहे, हे आता महायुतीतील मराठे पाहणार आहेत. मराठा बांधवांनी काही महिने गेल्यानंतर एकत्र आले पाहिजे. वेळप्रसंगी आणि वेळोवेळी मराठा बांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकत नाही, असे ते म्हणाले.

मराठा समाज मला उघडं पडू देणार नाही. आपल्या लेकराबळांना न्याय देण्यासाठी मी जीवाची बाजी लावायला तयार असतो. सामूहिक उपोषणासाठी आम्ही खूप ताकद लावणार होतो पण आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आणि ज्यांच्या घरचा विरोध नाही त्यांनी उपोषणाला बसू शकतात. आपल्या जातीसाठी शहीद झालं तरी काही होत नाही, त्यामुळे ज्यांना मनाने बसायचं आहे त्यांनी उपोषणाला बसावं.संतोष देशमुख प्रकरणातून एक इंचाही मागे सरकणार नाही, कोणाचाही बाप आला तरी मॅटर दाबू देत नाही, असे ते ठामपणे म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *