मुंबईतील मालाडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला काहीच मौल्यवान वस्तू मिळाली नाही, म्हणून त्याने जे केलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. घरात काहीच मौल्यवान गोष्टी न सापडल्याने चोरटा घरातून तर निघून गेला, पण त्याआधी त्याने घरात असलेल्या महिलेला किस (Kiss) केलं आणि मगच घरातून पळ काढला. यामुळे हादरलेल्या महिलेने यासंदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ही अजब घटना ऐकताच पोलिसही अवाक् झाले पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास करत त्या भुरट्या चोराला बेड्या ठोकून अटक केली. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
चोर घरात घुसला आणि ..
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी ही अजब घटना घडली. याबाबत कुरार पोलिसांनी माहिती दिली. एका महिलेचा विनयभंग आणि घरात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मालाडमध्ये राहणाऱ्या 38 वर्षांच्या महिलेने तक्रार नोंदवली होती. ती महिला घरी एकटीच होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर आरोपीने महिलेला धाक दाखवत घरातील सर्व मौल्यवान वस्तू, मोबाई, एटीएम कार्ड आणि पैसे देण्यास सांगितलं. पण घरात काहीच मौसल्यवान नसल्याचे त्या महिलेने आरोपीला सांगितलं. तेव्हा निघून जाण्यापूर्वी आरोपीने त्या महिलेला किस केलं आणि तो फरार झाला, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे ती महिला हादरली होती, मात्र चोर पळून गेल्यानंतर तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सगळा प्रकार कथन केला.ही अजब घटना ऐकून पोलसिसही क्षणभर अवाक् झाले, पण त्यांनी लागलीच गुन्हा दाखल करत त्या आरोपूचा सोध सुरू केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो आरोपी हा त्याच भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा यापूर्वी गुन्ह्यांचा कोणताही रेकॉर्ड नाही. तो कुटुंबासोबत राहतो, पण सध्या बेरोजगार आहे. पोलिसांनी त्याचा शोध लावत त्याला बेड्या ठोकून अटक केली.