काळ आला पण वेळ आली नव्हती असे म्हणतात, ते खरच घडले आहे कोल्हापूर येथे. कोल्हापुरात डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर देखील 15 दिवसांनंतर एक माणूस घरी स्वतःच्या पायावर चालत परतला. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
खरतरं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संताप येतो .हे खड्डे अनेकदा जीवघेणे ठरले आहे मात्र कोल्हापुरात या खड्ड्यांमुळे एकाला नवसंजीवन मिळाले आहे. डॉक्टरांनी एका 65 वर्षीय व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्वजण एकत्र जमले. अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली रुग्णालयातून मृतदेह घरी आणताना चमत्कारच घडला.रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी आणताना स्पीडब्रेकरचा जोरदार झटका लागला आणि मृतदेहाच्या शरीरात हालचाल झाली. आणि मयत व्यक्ती जिवंत झाली.
पांडुरंग उलपे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ही घटना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील आहे. पांडुरंग उलपे यांना 16 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला त्यांनतर कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पांडुरंग यांच्या मृत्यूमुळे घरात शोककळा पसरली. अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली.
रुग्णालयातून मृतदेह रुग्णवाहिकेतून आणत असताना रुग्णवाहिका एका स्पीडब्रेकर वरून गेली आणि जोरदार झटका लागला यामुळे पांडुरंग यांच्या हातातील बोटे हलू लागली आणि शरीरात हलचाल होऊ लागली. नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले असून तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली तिथे ते 15 दिवस उपचाराधीन होते. नंतर सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून ते घरी स्वतःच्या पायाने चालत गेले.
घटनेची माहिती देतांना उलपे म्हणाले, मी फिरून घरी आली आणि चहा घेतल्यावर चक्कर आले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मी बाथरूम मध्ये जाऊन उलटी केली नंतरचे मला काहीच आठवत नाही. पांडुरंग उलपे यांना मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाने सध्या या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.