2024 मध्ये मुंबईत नव्हे तर ‘या’ शहरात हॉटेलची सर्वाधिक बुकिंग; घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अवघ्या काही दिवसात 2024 हे वर्ष संपणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. अनेकांचे फिरण्याचे प्लान तयार झाले आहेत. काही लोक घरीच कसं एन्जॉय करता येईल याचाही प्लान आखत आहेत. तर काही लोक बरोबर सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या प्रयत्नात आहेत. पण काही लोक असेही आहेत की, जे गेल्या वर्षाचा जमाखर्च मांडताना दिसत आहे. ओयोने नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी 2024मध्ये लोक सर्वाधिक कोणत्या ठिकाणी गेले याची यादी दिली आहे.

ओयो रुम्सच्या रिपोर्टनुसार, लोकांनी 2024मध्ये पुरी, वाराणासी आणि हरिद्वार या तीर्थस्थळांना सर्वाधिक भेटी दिल्या आहेत. तर मुंबई आणि शिमलापेक्षा हैदराबादला भेट देणं अधिक पसंत केलं आहे. या वर्षी हैदराबादमधील हॉटेलचं सर्वाधिक बुकिंग झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

संपूर्ण वर्षात ओयोच्या प्लॅटफॉर्मवर कुणी कुणी बुकिंग केलं त्या आकड्यांच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार भारतात यंदाच्या वर्षी धार्मिक पर्यटनावर लोकांचा अधिक भर राहिला. लोकांनी सर्वाधिक पुरी, वाराणासी आणि हरिद्वारला भेट दिल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे अयोध्याला जाण्याकडे लोकांचा कल कमी असल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय देवघर, पलानी आणि गोवर्धन या ठिकाणीही भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आणि हॉटेल बुकिंग केल्याचं दिसून आलं आहे.

ओयो रिपोर्टनुसार, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली आदी ठिकाणे हॉटेल बुकिंगमध्ये अव्वल राहिली आहेत. तर सर्वात लोकप्रिय राज्य म्हणून उत्तर प्रदेशने आपलं स्थान अव्वल ठेवलं आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकालाही नागरिकांनी मोठी पसंती दिल्याचं या अहवालातून दिसून आलं आहे. पटना, राजमुंदरी आणि हुबळीसारख्या छोट्या शहरातील हॉटेल बुकिंगमध्ये 40 टक्क्याची वार्षिक वाढ झाल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

यंदाच्या वर्षी सुट्टीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांसाठी जयपूर आकर्षणाचं केंद्र होतं. तर गोवा, पुदुचेरी आणि म्हैसूर आदी सदाबहार शहर सुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होतं. मात्र, मुंबई यंदा पर्यटकांच्या पसंतीला उतरली नसल्याचंही दिसून आलं आहे. प्रवाशांनी छोट्या शहरांसोबतच वेगळ्या शहरांनाही भेटी देण्यावर भर दिल्याचं यंदाच्या वर्षात आढळून आल्याचं सांगण्यात आलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *