‘दोन -तीन लाखांचा गॉगल घालणाऱ्यांसाठी किंवा लिपस्टिकवाल्यांसाठी हे 1500 नाही, तर..’वाचा काय म्हणाले गोपीचंद पडळकर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) नव्याने चर्चेत आली आहे. या योजनेच्या अर्जांची छाननी केली जाईल, असे सांगितले होते. मात्र सध्यातरी असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे माजी बालकल्याण आणि महिला विकासमंत्री आदिती टकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, याच लाडकी बहीण योजनेवर गोपीचंद पडळकर यांनी मोठं विधान केलं आहे. ही योजना लिपस्टिकवाल्या, लाखाचं सँडल, गॉगल घालणाऱ्या महिलांसाठी नाही, असं पडळकर म्हणालेत. ते सोलापूर जिल्ह्यातील माळशीरसमधील मारकडवाडी येथे जाहीर सभेत बोलत होते.

ज्यांच्याकडे दीन-दोन-तीन लाखाची पर्स आहे…
“लोकांनी ओळखलं की देवेंद्र भाऊच सत्तेत हवे आहेत. सरकारने महिलांना 1500 रुपये दिले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की 1500 रुपयांत काय होतं? मला चॅनेलवाल्यांनी याबाबत विचारलं. मग मी चॅनेलवाल्यांना सांगितलं की हे 1500 रुपये ताज हॉटेलला बसून 1500 रुपयांची कॉफी पिणाऱ्यांसाठी नाही. हे 1500 रुपये ट्रायडेन्ट हॉटेलला 1000 रुपयांचा चहा पिणाऱ्यांसाठी नाही. दोन ते तीन लाखांचा गॉगल घालणाऱ्यांसाठी हे पैसे नाहीत. ज्यांच्याकडे दोन-तीन लाखाची पर्स आहे, त्यांच्यासाठीही हे पैसे नाहीत. ज्यांच्या पायात दीड लाखांचा, 50 हजारांचा, एका लाखाचं सॅन्डल आहे, त्यांच्यासाठी हे पैसे नाहीत. लिपस्टिकवाल्यांसाठी हे पैसे नाहीत,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

इंजेक्शनसाठी 50 रुपये नसतील तर…
तसेच पुढे बोलले की, मारकडवाडीमध्ये माझी जी बहीण रानात काम करते, तिच्या अंगात ताप आला, कणकण आली, थंडी आली आणि तिच्याकडे इंजेक्शनसाठी 50 रुपये नसतील तर त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. दुपारची शाळा सुटल्यानंतर मुलगा आईसक्रीम घ्यायला आईला 10 रुपये मागते. आई डब्यामध्ये, गाडग्यामध्ये बघते. पण दहा रुपये नसल्यामुळे या महिलेच्या डोळ्यात पाणी येते. मी माझ्या मुलाच्या हातात दहा रुपये देऊ शकत नाही, असं तिला वाटते. त्याच महिलेसाठी आमची ही योजना आहे, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *