Spread the love

मुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आज आमनेसामने आले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज मोठा राडा झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी गेले. एकनाथ शिंदे गेल्यावर्षीदेखील एक दिवस आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक दिवस आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. पण एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावरुन निघून गेल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटात मोठा राडा झाला. हा राडा इतका मोठा होता की पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांनाही कठीण जात होती.

 

या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमानशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. “बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिवस उद्या आहे. उद्या कोणताही संघर्ष, वाद नको म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला आधल्या दिवशी दर्शन घेतो. मी स्वत: आणि आमचे कार्यकर्ते आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. आम्ही नतमस्तक झालो. त्यानंतर आम्ही निघालो. आमचे कार्यकर्ते निघत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी वातावरण, कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं. खरं तर तसं करण्याची आवश्यकता नको होती”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

‘मी मुख्यमंत्री म्हणून उद्या दर्शनाला जाऊ शकत नाही का?’

“पायाखालची वाळू सरकली म्हणजे सगळं गेलं, अशी भावना त्यांच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक असं वक्तव्य होतं की त्यांच्यासमोर सगळेच नतमस्तक होतो. आम्ही तर त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन पुढे जातोय. त्यांच्या विचाराचं सरकार आम्ही स्थापन केलंय. मी मुख्यमंत्री म्हणून उद्या दर्शनाला जाऊ शकत नाही का? कोणत्याही कार्यक्रमाला गालबोट नको म्हणून आम्ही स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला गेलो. गेल्या वर्षीही आम्ही एक दिवस आधी गेलो होतो”, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

 

“आम्ही दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्या यायचं होतं. पण त्यांनी मुद्दाम येऊन आमच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालणं, महिलांना शिवीगाळ करणं, अश्लिल हावभाव करणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मी कुठल्याही कार्यकर्त्याला आवाहन करतो की, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी. कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.


Spread the love