राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. महायुतीमधील तिन्ही पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद अजूनही संपले नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी मोठ्या मागण्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर ठेवल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे आपली बाजू मांडत विधानसभा अध्यक्षपद आणि 12 मंत्रिपदे मागितल्याचे वृत्त आहे. त्यातच गृह आणि अर्थ खातेही एकनाथ शिंदे यांनी हवे आहे. दरम्यान, मुंबईत महायुतीची होणारी बैठकही रद्द झाली आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी आपल्या गावी निघून गेले आहेत. आता ही बैठक 1 किंवा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेसाठी या मागण्या
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह आणि अर्थखाते होते. ही खाती एकनाथ शिंदे यांना हवी आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदही त्यांना हवे आहे. परंतु भाजप यासाठी तयार नाही. त्यामुळे युतीमध्ये तडजोड कशी होणार? हा प्रश्न पडला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर पालकमंत्रीपदाचा विषय ठेवला आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी देताना शिवसेनेचा योग्य तो सन्मान ठेवण्याची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले…
अमित शाह यांच्या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी संवाद साधला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मी पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणतेही मतभेद नाही. लाडका भाऊ हे पद मला कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आपणास मान्य राहणार असल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गुरुवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली होती. ही बैठक दोन तास चालली. त्या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जे.पी.नड्डा उपस्थित होते. या बैठकीपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर शुक्रवारी हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे राज्यात विविध प्रकारची चर्चा सुरु झाली आहे.