प्रतिनिधी :दर्पण गांवकर Updated on: Nov 08, 2023 |
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सध्या ईडीच्या रडावर आहेत. आज याच प्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलंय. ईडी कार्यालयात दाखल होण्याआधी किशोरी पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत काही सूचक विधाने केलीत.
“चौकशीचा भाग म्हणून मला ईडीने बोलावलं आहे. त्यांना सहकार्य करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आज हजर राहणार आहे. महापौर म्हणून अडीच वर्षात जे काम केले ते मुंबईकरांनी नव्हे तर अख्ख्या जगाने पाहिले आहे.”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर आरोप केले होते. त्यावरून बोलताना त्या म्हणाल्या की, “आता जवाब तो देना ही पडेगा… जवाब फक्त मीच नाही सगळ्यांना देना पडेगा आणि दुसरं म्हणजे आरोप कोण करतात?”
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत मुंबईत माझा जन्म झाला आहे. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगेल जे सांगेन ते खरं सांगेन आणि मी कधीही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाहीये.”, असं पेडणेकर यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आम्ही काम करत होतो तेव्हा कोणी घोटाळा केला असेल तर ते देखील समोर आलं पाहिजे. मी सुद्धा मागणी करेल पण फक्त आरोप करून प्रेशर आणयचं आणि स्वतःची कामे करून घ्यायची हे अजिबात चालणार नाही, असंही पेडणीकर म्हणाल्या.