भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला.
विवांत हॉटेलमध्ये विद्यामान आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते. यावेळी विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तसेच विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या, असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या, त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा क्षितिज ठाकूर यांनी आरोप केला आहे. सदर घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपचा खेळ खल्लास…जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली-
विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली. ठाकूरांचे कार्यकर्ते गाडी तपासण्यासाठी मागत आहेत. मात्र आयोगाच्या टीमने गाडी तपासल्यानंतर कार्यकर्त्यांनीच काही गैरप्रकार केला तर काय, असं विनोद तावडेंच्या टीमचं म्हणणं आहे.
सदर घटनेवर हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?
5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.