चेन्नई येथील कलैगनार येथील शताब्दी रुग्णालयाती एक व्यक्तीने रिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरला चाकूने (Chennai Doctor Stabbed) तब्बल सात वेळा भोसकले. कर्करोगग्रस्त रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीने हा हल्ला केल्याचे वृत्त आहे. या प्रकारामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णालयांवर होणाऱ्या हल्याबाबत (Healthcare Worker Safety) पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला बुधवारी (13 नोव्हेंबर) सकाळी झाला. आईच्या कर्करोगावरील उपचारांवर असमाधानी असलेल्या 26 वर्षीय आरोपीने बाह्यरुग्ण विभागातील (ओ. पी. डी.) डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला.
पीडित डॉक्टरला हृदयविकाराचा त्रास
आरोपीने कथीतरित्या हृदयरोगाचा रुग्ण असलेल्या डॉक्टरवर त्याच्या छातीत वरच्या भागावर, कपाळावर, पाठीवर आणि कानाजवळील जखमांसह अनेक वार केले. ज्यामुळे डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहे. अशी माहिती तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी दिली.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा हल्लेखोराने त्याच्या आईच्या उपचाराशी संबंधित कथित मुद्द्यांवर डॉक्टरांशी वाद घातला. त्याने डॉक्टरांवर चुकीचे औषध लिहून दिल्याचा आरोप केला. हल्ल्यानंतर हल्लेखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
सरकारकडून सुरक्षेची हमी
तामिळनाडू मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्वरित कारवाईचे आश्वासन दिले. सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात त्यांनी सरकारी डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या सुरक्षेच्या महत्त्वावर भर दिला. “आपल्या सरकारी डॉक्टरांचे निःस्वार्थ कार्य अमूल्य आहे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल “, असे त्यांनी एक्स वर तामिळ संदेशात लिहिले.
मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेची हमी
आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी पुष्टी केली की, शस्त्र लपवून ठेवल्यानंतरही रुग्णालयात सुरक्षेची कोणतीही चूक झाली नाही. हल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि सुरक्षा उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
हल्ल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी आणीबाणी नसलेल्या उपचारांना स्थगिती देत आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमुळे संरक्षणात्मक उपायांची तातडीची गरज अधोरेखित होत असल्याने, या घटनेने आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू केली आहे.