मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर मराठा उमेदवार उभे करून महायुतीला विशेषतः भाजपाला हिसका दाखवण्याची तयारी केली होती. पण वेळेवर त्यांनी माघार घेतली. या माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ होईल? यावर प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या हंगामात मैदानात उतरण्याची आणि तितक्याच शिताफीनं माघार घेण्याची कसरत लीलया केली. त्यांनी अनेकांना चकमा दिला. राजकीय विश्लेषकांपासून अनेक पक्षातील नेत्यांना त्यांचा हा यूटर्न अचंबित करणारा होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करून महायुतीला विशेषतः भाजपाला हिसका दाखवण्याची तयारी केली होती. पण वेळेवर त्यांनी माघार घेतली. या माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ होईल? यावर प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन केले. त्यांच्या उपोषणापुढे राज्य सरकारला अनेकदा नमतं घ्यावं लागल्याचे चित्र उभ्या देशानं पाहीलं. पण तरीही ओबीसीत सरसकट समावेशाची मागणी आणि सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. सरकारला हे आंदोलन अवघड जागेचं दुखणं झालं. लोकसभेत मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपसह महायुतीला सहन करावा लागला. आता विधानसभेच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला. त्यासाठी उमेदवार उभं करण्याची घोषणा केली. अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या रांगा लागल्या.
तर धास्तीने सर्व पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेत सबुरीचा सल्ला दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जरांगे पाटील यांनी उमेदवार उभं न करण्याचे जाहीर केलं. या माघारी नाट्याची एकच चर्चा रंगली. कुणी ही भाजपासाठी हा अपशकुन असल्याचा दावा केला. तर कुणी जरांगे पाटील यांच्यावर दबाव असल्याचे म्हटले. आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.