ठाणे जिल्ह्यातून पुन्हा एकदा बलात्काराची बातमी समोर येत आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये 17 वर्षीय मुलाने 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. उल्हासनगर परिसरातील एका गृहनिर्माण संकुलाच्या आवारात गेल्या महिन्यात हा कथित गुन्हा घडला होता, जिथे अल्पवयीन मुलाचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
पीडित मुलगी आणि तिचे पालक सोसायटीच्या आवारात राहतात. एफआयआरचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलगा पीडिता एकटी असताना तिच्या घरी गेली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तिच्या घराकडे धाव घेतली असता ते घर आतून बंद असल्याचे आढळून आले.
दरम्यान, त्यानंतर स्थानिकांनी अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या त्याला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. तथापी, रविवारी उल्हासनगरच्या अंबिका मंदिरात नवजात मुलगी सापडली होती. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे व राकेश माने यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना दिली होती. त्यानंतर मुलीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील अंबिका मंदिराच्या पायरीवर ठेवलेल्या गोणीत हालचाल होत असल्याचे काही नागरिकांना दिसले. सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे, राकेश माने यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गोणी उघडल्यानंतर त्यांना आत नवजात अर्भक आढळून आले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते डोंगरे व माने यांच्यासह त्यांनी बाळाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी मुलीवर उपचार सुरू केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.