विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी अखेर मुंबईतील शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे थोड्याच वेळात नवाब मलिक हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बऱ्याच दिवसांनपासून सुरु असलेला नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबतचा खल आता संपला आहे.
नबाव मलिक यांच्यावर असलेल्या मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. या आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मलिकांच्या उमदेवारीबाबत निश्चितता नव्हती. मात्र आता अजित पवारांनी मलिकांना अखेर उमेदवारी दिल्याचं कळतं आहे. मलिकांकडे एबी फॉर्मदेखील पोहोचला आहे.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मतभेद होते. नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होते. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर आरोप केले होते. अजित पवार भाजपसोबत गेले. त्यानंतर नवाब मलिक यांना जेव्हा जामिन मिळाला. तेव्हा ते अजित पवार गटासोबत गेले. तेव्हापासूनच मलिकांनी महायुतीत येण्याचा शिंदे गट आणि विशेषत: भाजपचा विरोध होता. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्रदेखील लिहिलं होतं. मलिकांच्या विधानसभेच्या उमेदवारीलाही भाजपकडून कडाडून विरोध होता.