विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार (Ajit Pawar) संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते अशी टीका शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी केली. बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नीचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000 मतांनी मागे असल्याचे जानकर यांनी सांगितलं. या निवडणुकीनंतर राजकारणातून संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील असा टोलाही उत्तम जानकर यांनी लगावला.
माळशिरसमध्ये भाजपला उमेदवार मिळवून देईल
माळशिरसमध्ये (Malshiras) जर भाजपला (Bjp) उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन असा खोचक टोला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी लगावला. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष सुरु आहे. राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.
राम सातपुतेंच्या नावाची अद्याप घोषणा नाही
भाजपने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिली यादी 99 उमेदवारांची होती. तर दुसरी यादी 22 उमेदवारांची होती. यामध्ये काही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा अद्याप केली नाही. यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच माढयातून देखील महायुतीन अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं अशात, नेमकी कोणाच्या वाटेला ही जागा जाणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माळशिरसचे विद्यमान आमदार हे राम सातपुते आहे. अद्याप भाजपनं त्यांच्या उमेदवारीच्या नावाची घोषमा केलेली नाही.
राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवचा धक्का बसला होता. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा परभाव केला होता. त्यानंतर आता भाजप राम शिंदे यांना पुन्हा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार का? की भाजप दुसरा चेहरा मैदानात उतरवणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.