ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी भारत आणि चीनमध्ये (China) एक मोठा करार झाला आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवरील गतिरोध संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये हा करार झाला आहे. या अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या जुन्या जागी जातील. यासोबतच येथे गस्तही सुरू होणार आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातही भेट होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आता या कराराची जमिनीवर अंमलबजावणी कशी करायची, याबाबत चर्चा सुरू आहे. यामध्ये, विघटन आणि नंतर गस्त सुरू करण्याची पद्धत निश्चित केली जाईल.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये माहिती देताना सांगितले की, भारतीय आणि चिनी सैनिक मे 2020 मध्ये सीमा संघर्ष सुरू होण्यापूर्वी, ज्या पद्धतीने गस्त घालत होते, आता त्याच पद्धतीने पुन्हा गस्त घालू शकतील. यापूर्वी, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनीही घोषणा केली होती की, भारत आणि चीनने हिमालयीन प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त व्यवस्थेसाठी पुन्हा सहमती दर्शविली आहे. यामुळे सैन्य माघारी येईल आणि तणाव निवळेल, असा दावा त्यांनी केला.
एस जयशंकर म्हणाले की, हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी प्रस्तावित रशियाच्या दौऱ्याच्या आधी आले आहे. जयशंकर यांनी एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांना सांगितले की, आम्ही गस्तीबाबत करार केला आहे. यासह आम्ही 2020 च्या स्थितीकडे परत आलो आहोत. त्यामुळे आता चीनसोबतचे सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. यासोबतच योग्य वेळी तपशील सार्वजनिक केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जय शंकर म्हणाले की 2020 नंतर विविध कारणांमुळे अडथळे निर्माण झाले होते. आम्ही त्यांना दूर केले आहे. आम्ही आता एक करार केला आहे, ज्यानुसार आमचे सैन्य 2020 पूर्वीप्रमाणे गस्त घालण्यास सक्षम असेल. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, एलएसी वर मिळालेले हे यश धीर आणि खंबीर मुत्सद्देगिरीमुळे शक्य झाले. दरम्यान, 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले असून अनेक चिनी सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. मात्र, याचा दोन्ही देशांच्या व्यापारावर परिणाम झाला नाही.