राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची घट्ट मैत्री होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री तीन जणांनी बाबा यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
आतापर्यंत पोलिस तपासात काय समोर आलं?
बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी वांद्रे येथे गोळीबार केला. हे आरोपी 2 सप्टेंबरपासून मुंबईतील कुर्ल्यामध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होते. त्यांनी राहत्या खोलीसाठी महिन्याला 14 हजार रुपये घरभाडं देत होते.चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. यामध्ये चार आरोपी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घेणार होते. या हत्येचा संबंध बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता. तिन्ही आरोपी बिश्नोई गँगमधील सदस्याच्या संपर्कात आले. यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी घेतली.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीका यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर शनिवारी रात्रीच तीन आरोपींना अटक करण्यात आली. यामधील एक आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. यासाठी एक पथकं उज्जैनला रवाना झालं आहे. या फरार आरोपीच्या शोघासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला, त्यावेळी देखील आरोपींनी अशाच प्रकारे नियोजन केलं होतं. यामुळे आता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याकारणाने त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकींवर सहा राऊंड फायर
आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्या. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी कळताच अभिनेता सलमान खान शूटिंग सोडून हॉस्पिटलला रवाना झाला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडचा नेता सलमान खानही लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे. बाबा सिद्दीकीच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अँगलचा पोलिस तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानला मदत केल्याचा बदला म्हणून बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी
सोशल मीडियावर बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेत, सलमान खानसोबतची मैत्री याचं कारण असल्याचं म्हटलं आहे. या आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कुख्यात गुंड दाऊद आणि सलमान खान यांना मदत केल्यामुळे हत्या केल्याचं त्याने या पोस्टमध्ये मान्य केलं आहे.