जगातील दिग्गज उद्योगपतीपैकी एक असलेले रतन टाटा (Ratan Tata) आता आपल्यात नाहीत. बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. तसेच आता रतन टाटा यांचा पुढचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे. त्यांच्या 3800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसा कोणाला मिळणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
रतन टाटाचा वारस कोण असेल?
रतन टाटा यांनी कोणाशीही लग्न केले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच त्याला मूल नाही. अशा स्थितीत रतन टाटा यांच्या संपत्तीचा वारस कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या संभाव्य उत्तराधिकारींमध्ये रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे आघाडीवर आहेत. नोएल टाटा यांचा जन्म रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांच्या पोटी झाला आहे. कुटुंबाचा एक भाग असल्याने उत्तराधिकाऱ्यांमध्ये नोएल टाटा यांचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. नोएल टाटा यांना तीन मुले आहेत. त्यांची नावे माया टाटा, नेव्हिल टाटा आणि लिया टाटा अशी आहेत. रतन टाटा यांच्या मालमत्तेच्या संभाव्य वारसांपैकी हे देखील आहेत,
नोएल टाटाची मुले काय करतात?
नोएल टाटा यांची तिन्ही मुले सध्या टाटा समूहात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. 34 वर्षीय माया टाटा यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये भूमिका बजावल्या आहेत. टाटा न्यू ॲप लॉन्च करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नेव्हिल हे टाटा ट्रेंट लिमिटेड या आघाडीच्या हायपरमार्केट चेन स्टार बाजारचे नेतृत्व करतात. त्याच वेळी 39 वर्षीय लिया टाटा टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची देखरेख करत आहेत. त्यांच्यावर ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसची जबाबदारी आहे.
रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज आणि उद्योगपती शोक व्यक्त करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं असून हा दिवस ‘भारतासाठी दुःखाचा दिवस’ आणि वैयक्तिक नुकसान असल्याचे म्हटले आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये अंबानी यांनी टाटा यांचे एक दूरदर्शी उद्योगपती, एक परोपकारी आणि प्रिय मित्र असे वर्णन केले. त्यांनी टाटा परिवार आणि संपूर्ण टाटा समूहाप्रती शोक व्यक्त केला.