परमेश्वरावर महापुरुषावर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊत करू शकतात. कलम 370 रद्द केलं म्हणून अमित शाह यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. अस काम असणाऱ्यांना टोकणं हे संजय राऊतच करू शकतात, अशी खोचक टीका उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
तर 2019 लाच युतीचे सरकार आलं असतं
चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2024 मध्ये तिन्ही पक्षांच्या मिळून 170 च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अन्य चांगल्या योजना या सरकारने लोकांना दिल्या आहेत. या योजना देऊनही लोक उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखे महाराष्ट्र ची जनता नाही. उपकाराची भावना काहींनी ठेवली असती, तर 2019 मध्ये युतीचे सरकार आलं असतं. आता त्यांचं जे नुकसान झाले ते झालं नसतं, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर नाव न घेता केली. पाटील यांनी सांगितले की, अमित शाह दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते 2029 बाबत बोलले असतील. राज्यामध्ये 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही कडाडून टीका केली आहे.
राधानगरीची सीट अबिटकरांनाच मिळेल
दरम्यान, कोल्हापूरमधील जागावाटपावरून चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कितीही मारामाऱ्या झाल्या, तरी विद्यमान आमदाराची जागा ही त्याच पक्षाला मिळेल. त्यामुळे राधानगरीची जागा प्रकाश अबिटकरांनाच मिळेल. अडचणीच्या काळात जे सोबत आले त्यांना एकनाथ शिंदे कधीही अंतर देत नाहीत. त्यामुळे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकरच असतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन.
दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी मुलीवरून केलेल्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, देवेंद्र भुयार हे माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले आहेत माहित नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल, तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन.