पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडणारा ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामधील या निसर्गरम्य घाटरस्त्याला भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. आता ताम्हिणी घाटात या पावसाळ्यात 9,644 मिमी पाऊस झाला, ज्यामुळे ते भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, मेघालयातील चेरापुंजी येथे या पावसाळ्यात झालेल्या एकूण पावसापेक्षा (7,303.7 मिमी) ताम्हिणी घाटात झालेला हा पाऊस जास्त आहे.
ताम्हिणी घाटातील पावसाच्या आकडेवारीला अद्याप आयएमडीकडून अधिकृतपणे पुष्टी मिळणे बाकी आहे, कारण अद्याप संकलन केले गेले नाही. मात्र ताम्हिणी घाट परिसरात एका दिवसात सुमारे 3,000 मिमी पावसाची नोंद झाल्याच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्याने, आयएमडी अधिकाऱ्यांनी जास्त पावसाच्या शक्यतेला सहमती दर्शवली आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. ताम्हिणी घाट किंवा पश्चिम घाटातील इतर भागात एवढ्या मोठ्या पावसाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ताम्हिणी घाट आणि पश्चिम घाटातील इतर भागात जास्त पावसाच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि त्यावर हवामान शास्त्रज्ञांनी एक वैज्ञानिक शोधनिबंधही प्रकाशित केला आहे.
एस डी सानप, वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी पुणे म्हणाले, ‘आम्ही स्थलाकृति पाहिल्यास, ईशान्य भाग आणि पश्चिम घाट दोन्ही उच्च उंचीवर आहेत. सह्याद्री पर्वतरांगेने या प्रदेशात कमालीचे मोठे ढग निर्माण केले, विशेषत: ताम्हिणीजवळील घाट भागावर, ज्यामुळे या भागात अतिवृष्टी झाली. शिवाय, अरबी समुद्रातून येणारा जोरदार मान्सूनचा प्रवाह आणि गुजरात आणि महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या प्रणालींमुळेही महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात जास्त पाऊस पडतो.’
ताम्हिणीव्यतिरिक्त दावडी, भीमाशंकर, शिरगाव, लवासा आणि लोणावळा या भागातही या पावसाळ्यात 5,000 ते 7,0000 मिमी पाऊस झाला. शिवाय साताऱ्यातील महाबळेश्वर, वाळवण आणि कोयना; कोल्हापुरात गगनबावडा आणि आंबोली; नाशिकमधील घाटघर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये या पावसाळ्यात जास्त पाऊस झाला. दरम्यान, महाराष्ट्रातील मान्सूनची माघार आता नेहमीप्रमाणे उशिराने येण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर भारतातून मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे आणि महाराष्ट्रातून मान्सून सामान्य तारखांना माघारी येण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी परिस्थिती येत्या काही दिवसांत समोर येईल.