शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने देशी गायी (Deshi Cows) ‘राज्यमाता-गोमाता’ (Rajyamata-Gomata) म्हणून घोषित केल्या आहेत. हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात गायींची पूजा केली जाते. या पार्श्वभूमीवरचं महायुती सरकारने देशी गायी राज्यमाता असल्याचे जाहीर केले आहे. विधानसभेच्या तोंडावर सोमवारी एक कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेऊन राज्य सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता- गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.
भारतभरात आढळणाऱ्या गायींच्या विविध जातींवर प्रकाश टाकून, महाराष्ट्र सरकारनेही देशी गायींच्या घटत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. आपल्या अधिकृत आदेशात, सरकारने शेतीमध्ये शेणाचा वापर करण्यावर भर दिला आहे. गाय आणि तिच्या उत्पादनांशी संबंधित सामाजिक-आर्थिक घटकांसह धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने पशुपालकांना देशी गायी पाळण्यास प्रोत्साहित केले आहे.