बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) नुकतीच संग्राम चौगुलेच्या (Sangram Chougule) रूपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. या एन्ट्रीनंतर संग्राम चौगुले अरबाज पटेल याला (Arbaaz Patel) तोडीस तोड टक्कर देईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण आता दोनच आठवड्यात संग्रामचा खेळ संपला आहे. वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर पडावं लागलं आहे. संग्रामला पहिल्याच टाक्समध्ये धाप लागली होती. दरम्यान आता गंभीर दुखापत झाल्याने संग्रामवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचंही बिग बॉसने म्हटलं आहे.
बिग बॉसच्या घरात संग्रामच्या एन्ट्रीचा ट्रेलर खूपच गाजला होता. ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांना वाटले होते, आता पिक्चर रंगणार, पण अवघ्या काही आठवड्यात प्रेक्षकांच्या या आशा धुळीस मिळाल्या आहेत. बिग बॉसने जशी संग्रामला घरात वाईल्ड एन्ट्री दिली होती. त्याप्रमाणे तो घरात पहिल्याच दिवशी वाईल्ड वागला देखील. बिग बॉसने त्याला नावडत्या सदस्याला पाण्यात ढकलायचा टास्क दिला होता. या टास्कमध्ये त्याने निक्कीने नकार देताना देखील तिला पाण्यात ढकलून दिले होते.
अरबाजने एका टास्कमध्ये युक्ती दाखवून टाक्स जिंकून दिला होता. त्यामुळे अरबाजचा पराभव करण्यात संग्राम अपयशी ठरला होता. त्यात आता अंड्याच्या टास्कमध्ये अरबाज आणि संग्रामची जोरदार भिडत झाली होती. यामध्ये संग्राम गंभीररित्या जखमी झाला होता. संग्रामला दुखापत झाल्याने त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यामुळे घरात आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने दोनच आठवड्यात खेळ आटोपता घेतला.