संजय दत्त नव्हे तर शाहरुख खान साकारणार होता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये मुख्य पात्र,आणि सर्किट च्या जागी..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यात काही सिनेमे असे आहेत की त्या सिनेमांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत, तर त्यांचे संवाद आजही ओठांवर आहेत. असाच एक सिनेमा म्हणजे ‘मुन्नाभाई एमबीबीएस.’ राजकुमार हिराणी यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांना मुन्ना आणि सर्किटची जोडी दिली. संजय दत्त आणि अर्शद वारसीने त्यांच्या दमदार अभिनयाने या भूमिकांना न्याय दिला. पण, हा सिनेमा संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी करण्याआधी दोन वेगळे कलाकार या भूमिका साकारणार होते. मुन्नाभाईची भूमिका शाहरुख खान करणार होता, तर सर्किटच्या भूमिकेत मराठमोळे अभिनेते मकरंद देशपांडे दिसणार होते.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमाचे संवाद लेखक अब्बास टायरवाला यांनी या सिनेमाच्या निर्मितीविषयीचे काही किस्से ‘सायरस सेज’ या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टवर सांगितले.

अब्बास टायरवाला म्हणतात, एकदा सिनेमा लिहून पूर्ण झाला की त्यात कोणाचाही हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना सिनेमा लिहून झाल्यानंतर सेटवर जाण्याची फारशी इच्छा नसते. याच पॉडकास्टमध्ये अब्बास यांना विचारण्यात आले की, चित्रपटाच्या सेटवर जर संवाद बदलले तर काय होते? त्यावर ते म्हणाले, कधी ते बदल सिनेमाला फायदा करून देतात तर कधी नुकसान. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चं उदाहरण देताना अब्बास म्हणाले, या सिनेमात झालेले बदल चांगले आणि संस्मरणीय होते.

‘सर्किट’ नव्हे, ते ‘खुजली’
अब्बास पुढे सांगतात, जेव्हा आम्ही मुन्नाभाई लिहीत होतो, तेव्हा सर्किट या पात्राचं नाव खुजली होतं. त्यावेळी शाहरुख खान मुन्नाभाईची भूमिका साकारणार होता, तर मकरंद देशपांडे खुजली हे पात्र साकारणार होते. मात्र, काही कारणांमुळे हे शक्य झालं नाही आणि पुढे संजय दत्तने मुन्नाभाईची भूमिका केली, तर सर्किटची भूमिका अर्शद वारसीने साकारली.

कसा झाला खुजलीचा सर्किट?
जेव्हा अर्शद वारसीला हा सिनेमा मिळाला, तेव्हा या पात्राचं नाव खुजलीच होतं. पण, अर्शदने या पात्राचा नीट विचार केला आणि त्याच्या स्वभावाचे बारकावे पकडले. या पात्राचा संयम पटकन सुटायचा आणि त्याला लगेच राग यायचा. त्याचा स्वभाव शीघ्रकोपी (त्वरित राग येणारा) होता, त्याला शॉर्ट सर्किट म्हणता येऊ शकतं. म्हणून अर्शदनेच या पात्राचं सर्किट असं नामकरण केलं.

सिनेमा पाहिला अन् समजलं…
अब्बास यांनी या सिनेमाचे आणि खुजली या पात्राचे संवाद लिहिले होते. मात्र, खुजली पात्राचं नाव सर्किट झालं हे अब्बास यांना सिनेमा पाहिल्यावर समजलं. यावर अब्बास यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, हा राजकुमार हिराणी यांचा अतिशय उत्कृष्ट निर्णय होता. सर्किट हे लक्षात राहणारं आणि पटकन ओठांवर येणारं नाव आहे, जे त्या पात्रासाठी खुजलीपेक्षा अधिक योग्य आहे. खरंतर खुजली हे नाव मी दिलं नव्हतं, ते राजू (राजकुमार हिराणी) यांनी दिलं होतं. पण, सर्किट हे नाव पात्राला देण्याचा अंतिम निर्णय राजू यांचाच होता.

अब्बास टायरवाला यांनी ‘मैं हू ना’, ‘मकबूल’ आणि ‘पठाण’ या सिनेमांचे संवाद लिहिले आहेत. त्यांनी ‘जाने तू या जाने ना’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ आणि हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ या सिनेमांचे संवाद लिहीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *