रविवारी लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 22 सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री 12 पासून ते सकाळी 10 पर्यंत तब्बल तासांचा मोठा ब्लाॅक पश्चिम रेल्वेवर असेल. त्यामुळे रविवारी लोकल विलंबाने धावण्याची शक्यता आहे.
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे (Central Mega Block)
मुख्य मार्गिका
कुठे : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकल थांबणार नाही
हार्बर मार्ग (Harbour Mega Block)
कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांवर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वे (Western Mega Block)
कुठे : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवार मध्यरात्री 12 ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावतील. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर नेण्यात येतील. गोरेगाव – बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल पाचव्या मार्गिकेवरून धावतील. या लोकल राम मंदिर, मालाड, कांदिवली या स्थानकांवर थांबणार नाहीत. पहाटे 4.30 नंतर अंधेरी – विरारदरम्यान धावणाऱ्या डाऊन जलद लोकल ब्लाॅक कालावधी पूर्ण होईपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच चर्चगेट – बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल गोरेगावपर्यंत अंशत: रद्द करून गोरेगाववरून चर्चगेटकडे मार्गस्थ होतील. काही लोकल रद्द करण्यात येतील.