सतत वादात असणाऱ्या ससून रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. ससूनच्या कर्मचाऱ्यांनी 4 कोटी 18 लाख 62 हजार रुपयांचा गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाऊंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह अन्य 23 सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ससून रुग्णालय हे नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी एका बेवारस रुग्णाला ससूनमधून बाहेर सोडण्यात आले होते, तर काही दिवसांपूर्वी ससूनमध्ये औषधे उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. तर कित्येकदा एम आर आय मशीन वीस दिवस बंद असते, अशा अनेक घटना समोर येत असतात. या घटनानंतर ससूनचे अधीक्षक यल्लाप्पा जाधव डीन एकनाथ पवार यांचे ससून रुग्णालयाकडे लक्ष नसल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र आता याच ससून रुग्णालयात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आता याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ललित पाटील प्रकरणात आकांत तांडव करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून ललित पाटील प्रकरणाप्रमाणेच हा विषय उचलून धरावा अशी मागणी केली आहे. याप्रकरणी ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी तक्रार दाखल केली आहे.
आर्थिक अपहार करून फसवणूक
ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर आली होती. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली. तसेच, वैद्यकीय संचालनालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली. माने आणि चाबुकस्वार यांना सह्यांचे अधिकार दिले होते. त्याचा गैरवापर करून अधिष्ठाता यांची मान्यता नसताना अकाऊंटंट आणि रोखपाल यांनी ससूनच्या बॅंक खात्यातून स्वत:च्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपये जमा केले. आर्थिक अपहार करून फसवणूक केली, असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
गेल्या एक वर्षांपासून हा सर्व भ्रष्टाचार सुरू होता. याची माहिती ही कुणाला नव्हती. यामुळे ससूनमध्ये येणारा निधी नेमका कुठे जातो, हे या प्रकरणातून समोर आलं आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी ससून हॉस्पिटलला येत असतो. मात्र कर्मचारीच निधी गायब करत असतील तर गोरगरीब पेशंटला औषधे व उपचार कसे मिळतील असा प्रश्न उपस्थित होतो.
कुठलीही कारवाई नाही
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधीक्षक हे पद प्राध्यापकांसाठी असतानाही सहप्राध्यापक यलप्पा जाधव या ठिकाणी बसले कसे? असा प्रश्नही दादा गायकवाड यांनी उपस्थित करत आक्षेप नोंदवला आहे. यल्लाप्पा जाधव यांच्यावर कारवाई करू असा आश्वासन डिन एकनाथ पवार यांनी दिले होते. मात्र एक महिना उलटला तरीही अधीक्षक यलप्पा जाधव यांच्यावर कुठलीही कारवाई डीन एकनाथ पवार यांनी केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणानंतर ससूनमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध दादा गायकवाड यांनी दहा दिवस उपोषण केले होते.