जळगावाच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले. मात्र या जेवणातून तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.
जळगावातील सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या भंडाऱ्यात वरण-भात, गुलाब जामुन, भाजी असे जेवेण होते. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हे जेवण जेवले. हे जेवण जेवल्यानंतर काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे इत्यादी त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तामसवाडी येथून पारोळा या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले. साधारण 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर केलेल्या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली.
पालक चिंताग्रस्त
भंडाऱ्यात जेवणानंतरच विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येताच जळगावातील नागरिकांना धक्का बसला आहे. विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. सध्या पारोळा कुटीर रुग्णालयात या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. तर दोन विद्यार्थिनींना उपचारासाठी धुळ्यात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली आहे. सध्या शहरातील अनेक डॉक्टर उपचारासाठी दाखल झाले होते. या घटनेमुळे अनेक नागरिक हे चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
आमदारांसह माजी मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांची विचारपूस
या घटनेनंतर आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील यांनीही रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी कुटीर रुग्णालयात डॉक्टरांची तसेच स्टॉप, वार्डची वाढ करावी, अशीही मागणी केली.