लेखणी बुलंद टीम:
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ची (अध्यक्षपदाच्या उमेदवारांमधील वादविवाद) बरीच चर्चा होत असते. अमेरिकेत द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही असून तिथे प्रत्येक निवडणुकीआधी अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये वादविवादाच्या तीन फेऱ्या होतात. अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय विश्लेषक व पत्रकार या वादविवादाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाची झलक पाहायला मिळते असं म्हटलं जातं. कारण, अमेरिकेतील बहुसंख्य मतदार या आधारावर त्यांच्या नेत्याची निवड करतात, निवडणुकीत कोणत्या नेत्याला व पक्षाला पाठिंबा द्यायचा ते ठरवतात.
प्रेसिडेन्शियल डिबेटची पहिली फेरी जून महिन्यात झाली. त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असा सामना झाला. पहिल्या फेरीत ट्रम्प बायडेन यांच्यावर वरचढ ठरले. त्यापाठोपाठ काल (मंगळवार, १० सप्टेंबर) प्रेसिडेन्शियल डिबेटची दुसरी फेरी पार पडली. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सामना झाला. वादविवादाच्या दुसऱ्या फेरीत मात्र डेमोक्रॅट्सच्या कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरल्या.
एबीसी न्यूज या वृत्तवाहिनीने वादविवादाची दुसरी फेरी आयोजित केली होती. कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर शाब्दिक युद्ध झालं. अमेरिकेची अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क, इस्रायल-गाझा व रशिया-युक्रेन युद्ध, स्थलांतरीतांचे प्रश्न यावर दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. दरम्यान, सीएनएन व एसएसआरएसने प्रेसिडेन्शियल डिबेटनंतर एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणानुसार वादविवाद पाहणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांचं असं म्हणणं आहे की कमला हॅरीस या ट्रम यांच्यापेक्षा वरचढ होत्या. त्यांनी हे डिबेट जिंकलं आहे. सीएनएन व एसएसआरएसच्या सर्वेक्षणानुसार डिबेट पाहणाऱ्या ६३ टक्के लोकांनी म्हटलं आहे की या वादविवादात कमला हॅरिस जिंकल्या. तर, ३७ टक्के लोकांचं म्हणणं आहे की या वादविवादात ट्रम वरचढ होते.
सीएनएनच्या सर्वेक्षणानुसार वादविवादाला सुरुवात होण्यापूर्वी ५० टक्के लोक हॅरिस यांच्या बाजूने होते, तर ५० टक्के लोक ट्रम्प यांचं समर्थन करत होते. मात्र, वादविवादाच्या पहिल्या फेरीनंतर ६७ टक्के लोकांनी ट्रम्प यांना पसंती दिली होती, तर ३३ टक्के लोकांनी बायडेन यांना पसंती दर्शवली होती. मात्र वादविवादाच्या दुसऱ्या फेरीनंतर हे चित्र बदललं आहे. दुसऱ्या फेरीनंतर ६३ टक्के लोकांनी म्हटलं आहे की कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरल्या, तर ट्रम्प यांना केवळ ३७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.