लेखणी बुलंद टीम:
अभिनेता शाहरुख खान, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, राणा डग्गुबती, सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी हे मंगळवारी मुंबईत आयोजित झालेल्या ‘IIFA 2024’च्या प्री इव्हेंटला पोहोचले होते. या कार्यक्रमातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगामी पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी सहभाग घेतला होता. सोशल मीडियावर पापाराझींनी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डग्गुबती हा सर्वांसमोर शाहरुख खानच्या पाया पडताना दिसतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
कार्यक्रमात आधी शाहरुख नव्या पिढीच्या कलाकारांविषयी मस्करी करतो. नवी पिढी कशा पद्धतीने मोठ्या व्यक्तींच्या पाया पडते, याबद्दल तो मस्करी करतो. त्यानंतर राणा डग्गुबती स्टेजवर येतो आणि शाहरुखला आधी मिठी मारतो. मिठी मारल्यानंतर तो खाली वाकून शाहरुख आणि करण जोहरच्या पाया पडतो. “आम्ही पूर्णपणे साऊथ इंडियन आहोत आणि आम्ही अशाच पद्धतीने मोठ्यांचा आदर करतो”, असं राणा म्हणतो. हे ऐकून शाहरुखच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतं आणि तो पुन्हा राणाला मिठी मारतो. शाहरुखच्या बाजूला उभा असलेला करण जोहरसुद्धा राणाकडे पाहतो स्मित हास्य करतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दाक्षिणात्य लोक संस्कृती फार जपतात”, असं एकाने लिहिलंय. तर ‘किती विनम्र अभिनेता आहे हा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘राणाने अत्यंत सरळ पद्धतीने बॉलिवूडवाल्यांचा अपमान केलाय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दाक्षिणात्य कलाकारांचं आणि तिथल्या संस्कृतीचं कौतुक केलं आहे.
आयफा पुरस्कार सोहळा लवकरच अबु धाबीमध्ये पार पडणार आहे. शाहरुख खान, करण जोहर, राणा डग्गुबती, सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी हे सर्वजण मिळून पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. सिद्धांतसोबत मिळून अभिषेक हा ‘आयफा रॉक्स’चं सूत्रसंचालन करणार आहे. तर शाहरुख आणि करण मिळून मुख्य सोहळ्याचं सूत्रसंचालन करतील. ‘आयफा उत्सवम’चं सूत्रसंचालन राणा करणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, शाहिद कपूर, जान्हवी कपूर, क्रिती सनॉन यांचा समावेश आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान अबु धाबीमधील यास आयलँड याठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C_vmda9ocTX