गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही केजरीवाल सरकारने (Arvind Kejriwal Government) देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) थंडीच्या काळात वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी (Firecracker Ban) घातली आहे. दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, फटाक्यांची ऑनलाइन विक्री/वितरण यावरही बंदी घालण्यात येईल. फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावरील बंदी 1 जानेवारी 2025 पर्यंत लागू राहील. बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस, डीपीसीसी आणि महसूल विभाग यांच्या सहकार्याने एक कृती आराखडा तयार केला जाईल.
गेल्या वर्षीही दिल्ली सरकारने सप्टेंबर महिन्यात फटाक्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात बोलताना पर्यावरण मंत्री म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की हिवाळ्यात सर्व फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी असेल.
दिल्लीत हिवाळ्यात बिघडते हवेची गुणवत्ता –
ऑक्टोबरपासून दिल्लीची हवा खराब होऊ लागते. याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे ऑक्टोबरपासून हवामान बदलू लागते. तापमानात घट होऊन वाऱ्याच्या वेगावरही परिणाम होतो. दुसरे म्हणजे या हंगामात दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांतील शेतकरीही गव्हाचे शेत पेटवून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढते. याशिवाय, दिवाळीच्या सणात फटाके फोडल्याने परिस्थिती आणखी बिकट होते. दिल्लीत सदर बाजार, चांदणी चौक, कोटला, रोहिणी, लक्ष्मी नगर या बाजारपेठा प्रामुख्याने फटाक्यांच्या व्यवसायाचे केंद्र आहेत. मात्र, फटाक्यांवर बंदी आल्याने लोकांच्या रोजगारावरही विपरीत परिणाम झाला आहे.