अभिनेता रितेश देशमुख याने मुलांसोबत इको-फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती साकारली. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. आसमंत गणपती बाप्पााच्या आगमनात न्हाऊन निघाला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक सेलिब्रिटी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देतात. अभिनेता रितेश देशमुख महाराष्ट्राची संस्कृती जपणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आता पुन्हा एकदा त्याचं हे रुप पाहायला मिळालं आहे. रितेश देशमुखने मुलांसोबत मिळून स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची इको-फ्रेंडली अशी मातीची मूर्ती साकारली. याचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
रितेश देशमुखचा इको-फ्रेंडली बाप्पा
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्या घरीही दीड दिवसासाठी गणपती बाप्पा विराजमान होतात. रितेश देशमुख याच्या घरच्या बाप्पाचं रविवारी दीड दिवसांनी विसर्जन झालं. त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर यंदाच्या गणेशोत्सवाचं सेलीब्रेशन कशाप्रकारे केलं, याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या मुलांसोबत गणपती बाप्पाची मूर्ती साकारताना दिसत आहेत. त्याच्या दोन्ही मुलांसह इतर मुलंही गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना दिसत आहे. आपली संस्कृती जपणारा अभिनेता असं म्हणत चाहत्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.
इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं सर्वत्र कौतुक
रितेश देशमुख याने घरीच गणपती बाप्पाची मातीची मूर्ती साकारली. त्याच्यासोबत चिमुकल्यांनी ही आपल्या हातांनी लाडक्या बाप्पााला आकार दिला. या इको-फ्रेंडली गणपती बाप्पाची त्यांनी पुजा केली. त्यानंतर घरच्या घरीच इको-फ्रेंडली पद्धतीने छोट्या टबमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं. या इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यासाठी रितेश देशमुखला महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळत असून त्याच्या होस्टिंगचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरातीस स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी झाल्याचं पाहायला मिळत आहे.