लेखणी बुलंद टीम:
कल्याण- टिटवाळ्याजवळ एका गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका विवाहित मजूर महिलेवर तीन नातेवाईकांनी घरात घुसून बळजबरने आळीपाळीने सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पन्नास वर्षाचा सासरा, 22 वर्षाचा दीर आणि सोळा वर्षीय अल्पवयीन मामेभावाचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. सामूहिक लैंगिक अत्याचार होत असताना पीडित महिलेने विरोध केला. त्यावेळी तिघांनी तिच्यावर कोयत्याने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केले. तिच्यावर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेचा पती घरात नव्हता.
याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना तात्काळ अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार. पीडित विवाहिता कल्याण तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर आपल्या पतीसह मजुरी करून त्याच विटभट्टीवर एका झोपडीत राहते. तिन्ही आरोपींची या महिलेवर वाईट नजर होती. सहा सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास तिन्ही आरोपी पीडित विवाहितेच्या घरात घुसले, त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला, या घटनेला विरोध करताच या तिघांनीही तिला बेदम मारहाण करत तिच्यावर कोयत्याने वार केले.
या घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडित महिलेच्या झोपडी जवळ राहणाऱ्या नातेवाईकांनी तिला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यातील एका शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण तालुका पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम करीत आहेत.