आजारी पतीला रुग्णालयात घेऊन जात असताना महिलेचा रुग्णवाहिकेत विनयभंग

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आजारी पतीला रुग्णालयात घेऊन जात असताना महिलेचा रुग्णवाहिकेत विनयभंग (Molestation) केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात घडली. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्या पतीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवले. त्याला रस्त्यावरच सोडून ते निघून गेले. धक्कादायक म्हणजे निघून जाताना त्यांनी रुग्णाचा ऑक्सीजन सपोर्ट (Oxygen Support) काढला. त्यामुळे महिला आपल्या तडफडणाऱ्या नवऱ्यासोबत मदतीची वाट पाहात तिथेच थांबून होती. दरम्यान, मदत मिळाल्यानंतर सदर महिलेने पतीस गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले खरे. मात्र, तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 30 ऑगस्टदरम्यान सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडल्याची माहिती आहे.

आर्थिक दुर्बलतेमुळे पतीवरील उपचार अपूर्ण
महिलेने आपल्या आजारी पती हरीश यास जवळच्या स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. मात्र, काही दिवस उपचार घेतले तरी, त्याच्या प्रकृतीस आराम मिळत नसल्याने तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. वारंवार खालावत असलेली प्रकृती पाहून महिलेने पतीस दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरविले. मात्र, तिच्याकडे आवश्यक आर्थिक ताकद नसल्याने ती आपल्या पतीला खासगी रुग्णालयात दाखल करु शकत नव्हती. त्यामुळे असहाय महिलेने आपल्या आजारी पतीस घरी घेऊन जणे पसंत केले.

लैंगिक गैरवर्तनास विरोध करताच रुग्णवाहिकेतून उतरवले
दरम्यान, पतीला घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालकाने महिलेचा विनयभंग करत तिच्याशी लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिस पुढच्या सीटवर बसण्यासाठी दबाव टाकला. जेणेकरुन त्याला लैंगिक गैरवर्तन करता येईल. महिलेने त्यास विरोध करत आरडाओरडा सुरु करताच चालकाने रुग्णवाहिका थांबवली आणि तिच्या पतीचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन ती प्रणाली काढून घेतली. नंतर तिला आणि तिच्या नवऱ्याला रस्त्यावरच सोडून देत चालक रुग्णवाहिकेसह निघून गेला.

दागिणे चोरल्याचा आरोप
महिलेने आरोप केला आहे की, रुग्णवाहिका चालकाने तिचे दागिनेही काढून घेतले आणि ते घेऊन तो पसार झाला. दरम्यान, ती फारसा विरोध करु शकली नाही कारण तिचा पती आजारी होता आणि ऑक्सीजन पुरवठा बंद झाल्याने तो तडफडत होता. पीडितेने जेव्हा तिच्या भावाला आपल्यासोबत घडलेली हकीकत फोनवरुन सांगितली, तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. भावाने आणि पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी पीडितेस मदत केली. त्यांनी तिच्या आजारी पतीस रुग्णालयापर्यंत पोहोचवले. मात्र, तोवर उशीर झाला होता. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला. पीडितेने दावा केला आहे की, पोलिसांनी आरोपीस पकडण्यासाठी कोणत्याही स्वरुपाचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तो मोकाट आहे. महिलेने गाझीयापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *